27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र२००४ मध्येच भाजप-सेनेशी युती होणार होती

२००४ मध्येच भाजप-सेनेशी युती होणार होती

प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट, महाजनांमुळे युती फिस्कटली

मुंबई : प्रतिनिधी
भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ मध्येच आपली युती होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलाही ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचे, असे ठरले होते. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली. मात्र, प्रमोद महाजन यांच्यामुळे ही युती होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला.

खरे तर माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु त्यांना या सगळ््या घडामोडींमध्ये फारसे सहभागी करून घेतले नव्हते. दुस-या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण त्यांना वाटत होते की या युतीमुळे त्यांचे दिल्लीतील महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पवारांचेच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगत आहे, असे पटेल म्हणाले.

राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार गटाने भाजपा-शिवसेना महायुतीत प्रवेश केला आणि ते सत्तेत भागीदार बनले. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत तर त्यांच्याबरोबरचे आठ आमदार मंत्री झाले आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. अजित पवार गटातील नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वेगवेगळ््या प्रकारचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे याबाबतीत आघाडीवर आहेत. आज प्रफुल्ल पटेल यांनी याच मुद्यावरून गौप्यस्फोट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR