छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान अंतरवाली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. तसेच काहीही झाले तरी २० जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला आमचा मार्चा मुंबईत धडकणार आहे. मोर्चात पुण्यातून जास्त लोक सहभागी होतील. कोटीची संख्या तिथेच पार होणार आहे. यावेळी आम्ही स्वयंसेवक घेतले नाहीत, प्रत्येकाने आपले नियोजन करायचे आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावक-यांकडून जेवणाची सोय होणार आहे. दररोज ९०-१०० कि.मी.चा प्रवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचं, इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे.
पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये
अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे अद्याप ठरवले नव्हते. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवालीमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात कोणताही मुक्काम असणार नाही. पहिला मुक्काम शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात असणार आहे. आपण देवाकडे जात नाही, आपल्या मागण्यांसाठी सरकारकडे जात आहोत. त्यामुळे ज्याला जमेल त्याने चालायचे आहे. रोज सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंतच सर्वांनी चालायचे आहे. दुसरा मुक्काम करंजी घाट, बारा बाबळी(अ. नगर) येथे असणार आहे.
पुन्हा अंतरवालीचा प्रयोग करू नका, सरकारला इशारा
मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवावी तसेच सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. दोन्ही मैदानांची परवानगी मागितली आहे, पुन्हा अंतरवालीचा प्रयोग करू नका, असा इशारा पण त्यांनी सरकारला दिला आहे.