नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेच्या हल्ल्यात ‘शहीद’ झालेल्या शेकडो मुलांचा बदला घेण्याचा इरादा पक्का केला. दुसरीकडे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, पॅकेजिंग साहित्यही महागले आहे. त्यामुळे भारतातील बाटलीबंद पिण्याच्या पाणी उद्योगाला उत्पादन खर्चात मोठ्या वाढीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतातील अंदाजे ७० टक्के भूजल कोणत्या ना कोणत्या प्रकारे दूषित आहे, ज्यामुळे मोठी लोकसंख्या स्वच्छ, सुरक्षित पाण्यासाठी बाटलीबंद पाण्यावर अवलंबून असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत ऐन उन्हाळ््यात या उद्योगावरील वाढत्या खर्चाचा दबाव चिंतेचे कारण बनत आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलरवर उसळली असून वाढत्या तेलाच्या किमतीचा परिणाम भारतासह जगभरातील अनेक क्षेत्रांना जाणवू लागला आहे. आता आखाती देशातील संघर्षाची झळ भारतातील पॅकेज्ड वॉटर उद्योगापर्यंत पोहोचली असल्याचे रॉयटर्सने अहवालात म्हटले आहे.
बाटल्या, टोपण आणि लेबल्स बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या प्लास्टिकचा कच्च्या तेलातून वापर केला जातो. अशातच क्रूड ऑईलच्या दरात महागाईचा भडका उडाल्याने प्लास्टिक बाटल्यांसाठीचा मुख्य कच्चा माल-पॉलिमरची किंमत ५० टक्क्यांनी वाढून १७० रुपये प्रतिकिलो झाली तर बाटलीचे झाकण किंवा टोप्यांची किंमत दुप्पट झाली आणि ०.४५ रुपये प्रतियुनिट झाली आहे. याशिवाय कार्डबोर्ड बॉक्स, लेबल्स आणि चिकट टेपसह पॅकेजिंग साहित्याचीही जास्त किंमत मोजावी लागत आहे.
ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माहितीनुसार तब्बल २ हजार लहान उत्पादकांनी वितरकांसाठी प्रतिबाटली सुमारे ५ टक्के दरवाढ केली असून उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत किंमतींमध्ये सुमारे १० टक्क्यांपर्यंत आणखी वाढ होऊ शकते.
भारतातील बाटलीबंद पाण्याच्या बाजाराचे मूल्य सुमारे ५ अब्ज डॉलर्स असायचा अंदाज आहे. ज्यामध्ये मोठ्या राष्ट्रीय ब्रँड्सपासून ते लहान प्रादेशिक उत्पादकांपर्यंत हजारो उत्पादकांचा समावेश आहे. अशा स्थितीत जागतिक अस्थिरतेच्या काळात ऐन उन्हाळ््याच्या सुरुवातीलाच आपला बाजारातील हिस्सा गमावण्याचा धोका लक्षात घेता बिसलरी, किन्ले, अॅक्वाफिना, रिलायन्स आणि टाटा यासारखे लोकप्रिय ब्रॅण्ड्स सध्या ग्राहकांवर त्वरित वाढीव खर्च न लादता स्वत:च सोसत आहेत.
प्लास्टिक पॅकेजिंग
साहित्य महागले
बाजारातील उद्योग संघटनांच्या माहितीनुसार युद्धामुळे पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्या, टोप्या, लेबल्स आणि कार्डबोर्ड बॉक्स यांसारखे पॅकेजिंग साहित्य महागले आहे, ज्यामुळे लहान उत्पादकांना अधिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात युद्धाच्या झळा अधिक सोसाव्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

