26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाकांगारू आले रंगात!

कांगारू आले रंगात!

प्रारंभीच्या सलग दोन सामन्यांत पराभव झाल्यानंतर नंतरचे तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघ रंगात आला आहे. आता प्रत्येक सामन्यात अस्मिता पणाला लागल्यागत त्यांचा खेळ होतो आहे. पाच वेळचे विजेते रंगात येण्याचे मुख्य कारण म्हणजे डेव्हिड वॉर्नर, मॅक्सवेल यासारख्या फटके बहाद्दरांच्या अंगात येणे! त्यांच्या अंगात येणे म्हणजे भुतांचा नाच परवडला असे म्हणणे होय. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर कांगारूंनी प्रथम फलंदाजी घेतली. यामागे मोठी धावसंख्या रचणे आणि रनरेट वाढवणे हा मुख्य उद्देश होता.

चारशेपर्यंत धावसंख्या रचली गेल्याने मुख्य उद्देश साध्य झाला. वॉर्नरला फॉर्म सापडला होता. तो रंगात आला की त्याचा प्रत्येक फटका चौकारासाठीच असतो. मार्श लवकर बाद झाल्याने चांगली सलामी मिळाली नाही परंतु स्मिथने पाय रोवल्याने धावांचा धबधबा सुरू झाला. दुस-या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी झाली. यात स्मिथचा वाटा ७१ धावांचा होता. त्यानंतर लबुशेन समवेत वॉर्नरने ८४ धावांची भागीदारी केली. लबुशेन ६२ धावा काढून परतल्यानंतर कांगारूंची ३ बाद २४४ वरून ६ बाद २९० अशी मिनी घसरगुंडी उडाली. दरम्यान वॉर्नरने स्पर्धेतील दुसरे शतक फडकावले होते. शतक झळकावल्यानंतर त्याचे हेल्मेट काढून हवेत उडणे दुस-यांदा घडले.

त्याने विश्वकप स्पर्धेतील सचिनच्या सहा शतकांची बरोबरी साधली आणि आपल्याच देशाच्या रिकी पॉन्टिंगला (५ शतके) मागे टाकले. या सामन्यात अनेक विक्रम तुटले आणि नवे प्रस्थापित झाले. वॉर्नरने ९२ चेंडूत शतक ठोकले. अखेर १०४ धावा काढून तो बाद झाला. ४२ षटकांत कांगारूंची ६ बाद २९० अशी स्थिती झाली तेव्हा चारशे धावांचा टप्पा कोसो दूर वाटत होता. परंतु मॅक्सवेल नावाच्या आग्यावेताळाने असा काही थयथयाट केला की काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. मैदानावर अक्षरश: चौकार-षटकारांची बरसात झाली. त्याने ४४ चेंडूत ९ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार ठोकत १०६ धावा काढल्या. त्याचे काही फटके ‘आऊट ऑफ क्रिकेट बुक’ होते. ११ षटके शिल्लक असताना हा हैवान मैदानावर आला होता.

२७ चेंडूत त्याने अर्धशतकी मजल मारली. नंतर लिडेच्या षटकात दोन चौकार आणि सलग तीन षटकार ठोकत त्याने ४० चेंडूत शतक पूर्ण केले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वाधिक वेगवान शतक ठरले. यंदाच्या स्पर्धेत द. आफ्रिकेच्या मार्करमने ४९ चेंडूत विक्रमी शतकाची नोंद केली होती, तो विक्रम भारताच्या जावयाने मोडला. कांगारूंनी चारशेपर्यंत मजल मारली असली तरी डच संघाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करायला हवे. त्यांचे क्षेत्ररक्षक बाजीप्रभूसारखे लढले आणि आठ कांगारू जाळ्यात पकडले. फलंदाजीत मात्र त्यांना कर्तृत्व दाखवता आले नाही. ११ षटकांत ४ बाद ५३ अशी घरसगुंडी उडाल्यानंतर सामन्यात परतणे कठीणच होते. विक्रमजीतच्या २५ धावा सर्वोच्च ठरल्या. स्टार्क, हॅजलवुड, कमिन्सने प्रत्येकी एक, मार्शने २ तर चष्मीस झॅम्पाने ३ षटकांत ८ धावा देत ४ बळी घेतले. डच संघ ९० धावांत गारद झाला. कांगारूंनी ३०९ धावांनी विक्रमी विजय मिळवला. झॅम्पा जोमात आल्यावर प्रतिस्पर्ध्याला कोमात जाणे भाग आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR