जयपूर : एरवी काव्या मारन आयपीएल सामन्यांदरम्यान कधीही मैदानावर उतरत नाही, ती नेहमी स्टँड्समधूनच सामना पाहते. मात्र, एलिमिनेटर सामना संपल्यानंतर ती थेट महाराज यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर उतरली. तिने केवळ आपल्या संघातील खेळाडूंचे सांत्वन केले नाही, तर विरोधी संघातील म्हणजेच राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी कडे जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले.
वैभवने अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावांची जी वादळी खेळी केली, त्याने काव्या मारनलाही भुरळ घातली. पराभवाचे दु:ख बाजूला ठेवून काव्याने या १५ वर्षांच्या पोराच्या कौतुकास्पद कामगिरीचा आदर केला, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
इशान किशन आणि मुरलीधरन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा
मैदानावर आल्यानंतर काव्या मारनने हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि संघाचे सपोर्ट स्टाफ सदस्य मुथय्या मुरलीधरन यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. सामना हरल्यानंतर सहसा काव्याच्या चेह-यावर हसू दिसत नाही, मात्र यावेळी खेळाडूंशी बोलताना तिच्या चेह-यावर हसू उमटले होते, जे तिच्या क्रीडाप्रेमी वृत्तीचे दर्शन घडवून आणते.
हैदराबादचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगलं!
सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२४ मध्ये संघ फायनलपर्यंत पोहोचला होता, पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गेल्या काही वर्षांत हैदराबादने आयपीएलमध्ये धावांचे अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले, पण यंदाही त्यांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
















