इंफाळ : मणिपूरमध्ये राज्य पोलीस आणि भारतीय लष्कराने शनिवारी संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली
होती. या संयुक्त पथकांनी बिष्णुपूर आणि मणिपूरच्या आंतरजिल्ह्यांमधील संवेदनशील ठिकाणी ‘कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन्स’मध्ये शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक सामग्रीचा मोठा साठा जप्त केला आहे. शनिवारी सकाळी शीख रेजिमेंट, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. दरम्यान, बिष्णुपूर पोलीस ठाण्यांतर्गत उयुकपोक गावात एका ठिकाणी केलेल्या कारवाईत मॅगझिनसह दोन एसएलआरएस, जिवंत दारुगोळा असलेली एक कार्बाइन, चार ग्रेनेड, एक स्मोक बॉम्ब, दोन इंच पॅरा बॉम्ब आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय शुक्रवारी राज्य पोलीस आणि भारतीय लष्कराने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात शोधमोहीम राबवली. कारवाईदरम्यान मॅगझिनसह एक एके-५६ रायफल, मॅगझिनसह एक ९ मिमी पिस्तूल, दोन ग्रेनेड, चार सुधारित मोर्टार आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले मुद्देमाल पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एका अधिकृत अहवालात म्हटले आहे की, मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये, डोंगर आणि खोऱ्यात एकूण १३४ चौक्या/चेकपॉईंट उभारण्यात आले होते आणि पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील उल्लंघनाच्या संदर्भात ११३५ लोकांना ताब्यात घेतले आहे.