नवी दिल्ली : बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या आणि उल्कापातामुळे तयार झालेल्या विवरात निर्माण झालेल्या लोणार सरोवराचा प्रतिष्ठित अशा तिस-या १०० आयूजीएस भूवैज्ञानिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस (आययूजीएस) ही संस्था भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये, प्रक्रिया आणि शोध यांची उत्कृष्ट उदाहरणे असलेल्या तसेच विशेष वैज्ञानिक महत्त्व असलेल्या स्थळांना भूवैज्ञानिक वारसास्थळ म्हणून मान्यता देते, अशी माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.
पृथ्वी आणि तिचा इतिहास समजून घेण्यासाठी ही स्थळे जगातील काही सर्वात महत्त्वाची ठिकाणे मानली जातात. जगभरातील विविध भागांत ही स्थळे पसरलेली असून, पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या भूवैज्ञानिक ठिकाणांचा अनोखा प्रवास घडवून आणतात. निवेदनात म्हटले आहे की तिस-या १०० स्थळांची निवड ही २०२२ मध्ये स्पेनमधील झुमाया येथे जाहीर करण्यात आलेल्याह्याहिल्या १०० स्थळांच्या यशावर आणि जागतिक स्तरावरील प्रभावावर आधारित आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील बुसान येथे २०२४ मध्ये झालेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेदरम्यान दुस-या १०० स्थळांची यादी जाहीर करण्यात आली होती. २०२२ पासून ९० देशांतील एक हजाराहून अधिक तज्ज्ञ आणि २० आंतरराष्ट्रीय संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. या तज्ज्ञांनी विविध स्थळांची शिफारस करणे, निवड प्रक्रियेत सहभागी होणे आणि त्यांच्या वैज्ञानिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणे, असे काम केले आहे. आययूजीएस संस्थेत ७४ सक्रिय राष्ट्रीय सदस्य आहेत. जगातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे. मानवी कल्याणाच्या दृष्टीने पृथ्वीविज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभाग वाढवण्याला ही संस्था प्रोत्साहन देते.
विवर अंदाजे १२ हजार वर्षे जुने
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे विवर हे पृथ्वीवरील सर्वात अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या आणि अत्यंत चांगल्या स्थितीत जतन झालेल्या अतिवेगाने झालेल्या उल्कापातामुळे तयार झालेल्या वाटीच्या आकाराच्या विवरांपैकी एक आहे. हे विवर अंदाजे १२ हजार वर्षे जुने असून, त्याचा व्यास सुमारे १.८८ किलोमीटर आहे. सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या आणि विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या दख्खन ट्रॅप्स या बेसॉल्ट खडकांच्या थरांच्या मध्यभागी हे विवर वसलेले आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
बेसॉल्ट खडकांमुळे विशेष महत्व
बेसॉल्ट खडकांमध्ये तयार झालेल्या पृथ्वीवरील दुर्मीळ उल्कापातजन्य विवरांपैकी एक असल्याने लोणार सरोवराला विशेष महत्त्व आहे. बेसॉल्ट खडकांच्या पृष्ठभागावर अतिवेगाने झालेल्या उल्कापातामुळे तयार झालेल्या पृथ्वीवरील ज्ञात पाच विवरांपैकी हे एक मानले जाते. या विवराच्या मध्यभागी खारट आणि अल्कधर्मी पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे येथे एक वेगळे भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य निर्माण झाले आहे. विवराचा गोलाकार आकार, त्याची खोली आणि व्यास यांचे प्रमाण, आतील उतारांवर दिसणारे उघडे बेसॉल्ट लाव्हाचे थर, तुकडे झालेल्या खडकांचे जमिनीखालील थर, बाहेरच्या दिशेने झुकलेले मूळ खडकांचे थर, ढिगारे तसेच तुटलेल्या खडकांचे तुकडे आणि स्यूव्हाइट यांचा समावेश असलेले मोठ्या प्रमाणावरील बाहेर फेकलेले खडकांचे साठे, हे सर्व पुरावे या विवराची निर्मिती उल्कापातामुळे झाल्याचे स्पष्ट करतात, असे निवेदनात म्हटले आहे.
















