29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसोलापूरभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

सोलापूर- भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपापसातील मतभेद दूर ठेवून एकत्र येऊ आणि सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण याचा विचार न करता उद्यापासूनच कामाला लागण्याचा निर्धार महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हॉटेल लोटस येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिका-यांची बैठक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर महेश कोठे, अ‍ॅड. यू.एन. बेरिया, आरिफ शेख, संजय हेमगडी, प्रा. अशोक निंबर्गी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एम. एच. शेख, नलिनी कलबुगी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे लहू गायकवाड, आम आदमी पक्षाचे निहाल किरनळी, नीलेश संगेपाग, मल्लिकार्जुन चिलगेरी आदी उपस्थित होते. यावेळी खरटमल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे. सत्ताधारी भाजपने देशाच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून राममंदिराचा धार्मिक विषय घेऊन जनतेसमोर येत आहे.

सर्वसामान्य नागरिक महागाई बेरोजगारीसारख्या प्रश्नांनी त्रस्त असल्याचेही ते म्हणाले. माजी आमदार यलगुलवार म्हणाले, १९७८ साली आजच्या पेक्षाही वाईट परिस्थिती होती. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा रुजवण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी धर्मनिरपेक्ष लोकशाही मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. याप्रसंगी नरोटे, कोठे, निंबर्गी यांनीही मनोगत व्यक्त करून भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला जनता कंटाळलो आहे. त्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते आपल्या पाठीमागे असताना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले, प्रास्ताविकात अ‍ॅड. बेरिया यांनी लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी उद्यापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले.

या बैठकीस भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, विनोद भोसले, प्रमिला तुपलवंडे, अंबादास करगुळे, सुनील रसाळे, किसन मेकाले, प्रशांत बाबर, बाबा मिस्री, चंद्रकांत पवार, गणेश वङ्केपल्ली, महेश वड्डेपल्ली, आकाश गायकवाड आदी महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कुंभारीच्या माळरानावर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अथक प्रयत्नातून शहरातील हजारो श्रमिकांना घरे मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकूल वाटपाचा कार्यक्रम कुंभारीच्या (रे नगर) माळरानावर पार पडला. आम्हाला रातोरात बाजूला काढून भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला, तसेच पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आडम मास्तरांचा उल्लेखही केला नसल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ शेख यांनी या बैठकीत केला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR