नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आचार समितीसमोर हजर असताना त्यांच्याशी ‘अनैतिक, असभ्य, पूर्वग्रहदूषित’ वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. समितीचे अध्यक्ष, भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर यांनी या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्याऐवजी द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद पद्धतीने प्रश्न विचारून पूर्वकल्पित पक्षपातीपणा दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला.
कठोर शब्दांचा वापर करून मोइत्रा यांनी पत्रात लिहिले आहे की, आचार समितीच्या बैठकीत सुनावणीदरम्यान समितीच्या अध्यक्षांनी माझ्याशी केलेल्या अनैतिक, घृणास्पद आणि पूर्वग्रहदूषित वर्तनाची माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. त्यांनी माझे समितीच्या सर्व सदस्यांपुढे अपमान केले.
त्या म्हणाल्या की, समितीने स्वत:ला आचार समिती सोडून दुसरे नाव द्यावे कारण समितीत कोणतीही नैतिकता उरलेली नाही. विषयाशी संबंधित प्रश्न विचारण्याऐवजी, मला दुर्भावनापूर्ण आणि स्पष्टपणे अपमानास्पद रीतीने प्रश्न विचारून पूर्वकल्पित पक्षपातीपणाचे प्रदर्शन केले. यावेळी उपस्थित ११ पैकी पाच सदस्यांनी त्यांच्या या लाजिरवाण्या वर्तनाच्या निषेधार्थ सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार टाकला.