ढाका : बांगलादेशात आगामी सार्वत्रिक निवडणुकीला अवघे ६ दिवस उरलेले असताना राजधानी ढाकामध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. ९ व्या राष्ट्रीय वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचा-यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या जमुना या अधिकृत निवासस्थानावर धडक दिली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली, ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
आज सकाळी देशभरातील सरकारी कर्मचारी ढाक्यातील शहीद मीनार येथे एकत्र जमले. ‘पोटात अन्न नाही, तर कसला विकास?’ अशा घोषणा देत त्यांनी मोहम्मद युनूस यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. ९ व्या वेतन आयोगाचा गॅझेट त्वरित प्रसिद्ध करावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती. सकाळी ११.३० च्या सुमारास आंदोलकांनी शाहबाग येथील पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
पोलिसांची कारवाई आणि लष्कर तैनात
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि साऊंड ग्रेनेड्सचा वापर केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी गणवेशधारी सैनिकांना पाचारण करण्यात आले. या संघर्षात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या आंदोलनाला निवडणूक उधळवण्याचा करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
निवडणुकीवर बहिष्काराचे सावट
शेख हसीना यांच्या पाडावानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील केअरटेकर सरकारकडून निष्पक्ष निवडणुकांचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १२ फेब्रुवारी रोजी होणा-या मतदानापूर्वीच सरकारी कर्मचा-यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर आमच्यावर असेच हल्ले झाले, तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सध्या ढाकामध्ये तणावपूर्ण शांतता असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

