नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या ६ तारखेला इंडिया आघाडीची पुढची बैठक होणार आहे. काँग्रेसने याबाबत घोषणा केली आहे. मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बैठकीला जाणार नसल्याचे म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल मला काहीही माहिती नाही. आम्ही उत्तर बंगालमध्ये सहा-सात दिवस कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी जात आहोत. मला याबद्दल माहिती असती तर नक्कीच बैठकीला गेले असते, असे सांगितले.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी या रागाने निघून गेल्या होत्या. खुद्द शरद पवार यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला. मात्र त्या निघून गेल्या. इंडिया आघाडीने जाहीर केलेल्या समन्वय समितीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, ६ डिसेंबरच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील तब्बल २६ पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, टी.एम.सी. असे २६ पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला इंडिया आघाडी असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीची पुढची बैठक ६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे बोलावली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीसंदर्भात माहिती आपल्या सोबतच्या राजकीय पक्षांना दिली.