37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमविआचा फॉर्म्युला ठरला?

मविआचा फॉर्म्युला ठरला?

मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या सूत्रावर मागच्या अनेक दिवसांपासून खल सुरू होता. अखेर आता त्यांच्या जागावाटपाचे सूत्र ठरले असून, राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीतील ३ प्रमुख पक्षांत २०-१८-१० असे सूत्र ठरले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट सर्वांत मोठा पक्ष होऊ शकतो. दोन दिवसांत यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ८ जागांवर अजूनही कॉंग्रेस, शिवसेनेचा दावा सुरू असून, त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही समजते. या जागावाटपानंतर वंचितला तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातून वंचितला जागा देऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चेचे सत्र सुरू होते. बुधवारी अखेरची बैठक झाल्याचे खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगून टाकले. आता यापुढील बैठका वरिष्ठ नेत्यांसोबत होतील आणि जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर होईल, असे सांगतानाच जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाहीत, असे ते म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक २० जागांवर लढणार असल्याचे समजते. यासोबत कॉंग्रेस १८ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस १० जागांवर लढण्याची शक्यता आहे. यापैकी वंचित आघाडीला किती जागा द्यायच्या, यावर खल सुरू आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला जागा किती मिळणार आणि तो प्रस्ताव त्यांना मंजूर होणार का, यावर वंचितची भूमिका ठरू शकते. राज्यातील ४८ पैकी २७ मतदारसंघात वंचितचा प्रभाव असल्याचे आधीच सांगितले गेले आहे.

८ जागांवर अद्याप खल सुरूच
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अजूनही ८ जागांवर एकमत झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये रामटेक, हिंगोली, भिवंडी, जळगाव, शिर्डी, जालना, मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई या जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे यावर वरिष्ठ पातळीवर तोडगा निघू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR