18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअर्ध्या जगावर ‘एमफॉक्स’ विषाणूचा कहर

अर्ध्या जगावर ‘एमफॉक्स’ विषाणूचा कहर

भारतात २७ प्रकरणांची नोंद आतापर्यंत ११६ देशांमध्ये एमपॉक्स विषाणूचा प्रसार

नवी दिल्ली : कोरोना साथीतून जग आता पूर्णपणे सावरले आहे. मात्र आता एक नवे संकट समोर आले आहे. सध्या जगावर एमपॉक्स नावाच्या विषाणूचे संकट घोंघावत आहे. जगातील ११६ देशांमध्ये एमपॉक्स विषाणूचा प्रसार झाला आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावाने ओळखले जात होते. जागतिक आरोग्य संघटनेने(डब्ल्यूएचओ) एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. याचा त्रास झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठतात. हा विषाणू १९५८ मध्ये माकडांमध्ये सापडला होता. यानंतर तो मानवांमध्ये पसरू लागला आहे.

भारतात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव काय आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. मात्र, सध्या भारतात या विषाणूचा प्रभाव दिसून येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, भारतात जानेवारी २०२२ ते जून २०२४ दरम्यान एमपॉक्सची २७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात या प्रकारच्या विषाणूपासून कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. त्यावर उपचार करू शकणा-या काही लसी उपलब्ध आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर काटेकोर निरीक्षण करून आणि संक्रमित लोकांची वेळेवर ओळख करून व्हायरस नियंत्रित केला जाऊ शकतो.

काँगोमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांखालील मुलीही या विषाणूचा बळी ठरत आहेत, ही चिंतेंची बाब आहे. समलिंगी पुरुषांमध्ये या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातले आरोग्य कर्मचारी, कुटुंबीयांना देखील याचा धोका आहे. संसर्ग झाल्यानंतरही अंगावरील पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूर रहावे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

अनेकांमध्ये संसर्ग : डब्ल्यूएचओ
जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एमपॉक्स देखील संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत अनेक लोकांमध्ये याचा संसर्ग दिसून आला आहे.

दुस-यांदा आणीबाणी जाहीर
एमपॉक्स विषाणूचा धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने तीन वर्षांत दुस-यांदा आणीबाणी जाहीर केली आहे. यापूर्वी २०२२ मध्येही या विषाणूचा वेगाने प्रसार दिसून आला होता. एमपॉक्स विषाणूने १०० हून अधिक देशांमध्ये कहर केला होता. त्यावेळी २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

एमपॉक्सची लक्षणे
एमपॉक्स विषाणूमुळे व्यक्तीला त्वचेवर लाल पुरळ येतात, जे २-४ आठवडे राहू शकतात. या रुग्णाला ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्रायू दुखणे, पाठदुखी, अत्यंत थकवा येणं आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजेच शरीरावर गुठळ्या होऊ शकतात. एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR