24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदूध प्रश्नी तोडगा नाहीच

दूध प्रश्नी तोडगा नाहीच

- फक्त बैठकीचे आश्वासन - ७ दिवसानंतर दूध उत्पादकांचे आमरण उपोषण मागे

अकोले : दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी, गेल्या ७ दिवसांपासून जनसंघर्ष समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शेतक-यांचे आमरण उपोषण सुरु होते. बुधवारी ( २९ नोव्हेंबर)रोजी अखेर या आंदोलकांनी उपोषण मागे घेतले आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे. दूध दराच्या बाबतीत कोणताही तोडगा निघालेला नाही. फक्त बैठकीचे आश्वासने देण्यात आले असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी दिली आहे.

दुध दराच्या प्रश्नासंदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत अधिवेनाअगोदर बैठक होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी सात दिवस आमरण उपोषण केले. तर अजित नवले हे देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठई उपोषणाला बसले होते. त्यांनी चार दिवस आमरण उपोषण केले.

आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर डॉ. अजित नवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बैठका घेण्याचा फार्स करण्यापेक्षा तातडीने शेतक-यांना प्रतिलिटर ५ ते १० रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच दूध पावडर निर्यातीसाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी डॉ. अजित नवले यांनी केल्या आहेत.

आश्वासनापेक्षा सरकारने निर्णय घ्यावा
सहका-यांची तब्बेत लक्षात घेता आमरण उपोषण मागे घेणे गरजेचे होते, असे अजित नवले म्हणाले. सरकारने बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. आश्वासनापेक्षा निर्णय घ्या असे अजित नवले म्हणाले. दरम्यान, आमरण उपोषणाला बसलेल्या सहका-यांचे अजित नवले यांनी स्वागत केले.

शरद पवार यांच्याशी बोलणे महत्त्वाचे
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रक काढून उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत शरद पवारांचे बोलणे महत्वाचे असल्याचे नवले म्हणाले. त्यामुळे याबाबत काही हालचाली होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत बैठका होतच राहतील पण बैठकांसाठी थांबण्याची गरज नसल्याचे नवले म्हणाले.

दुधाचे दर कोसळले, शेतकरी हवालदिल
दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने ३४ रुपये दर देण्याचा आदेश देऊनही सहकारी आणि खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास २२ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे नवले म्हणाले. दुधाला ३४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR