बीड : बीडच्या नेकनूर पोलिस ठाणे हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षांच्या आजोबांनीच अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तर पीडितेच्या चुलत भावाने देखील तिच्यावर दीड वर्षापूर्वी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पॉक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतील गावात आजोबा-आजीसोबत राहणा-या १५ वर्षाच्या मुलीचे आई-वडील बाहेरगावी कामाला गेलेले आहेत. सध्या शाळेला सुट्या असल्याने आजी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी तिच्यासोबत बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. सदरील घटना घडल्यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागले त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना संशय आल्याने तिला विश्वासात घेतल्यानंतर घडलेली आपबीती मुलीने डॉक्टरांना सांगितली.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर दीड वर्षापूर्वी तिच्या चुलत भावाने देखील तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांना माहिती देताच सदरील प्रकरणात नेकनूर पोलिस ठाण्यात आजोबा आणि चुलत भावाविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. या संतापजनक घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नात्यांवरचा विश्वास हादरवणारी ही घटना असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलीवर स्वत:च्या आजोबांकडून अत्याचार झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणी केली असून संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला आहे.
















