ग्लासगो : येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सलग तिसरे सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास रचला. मीराबाईने यापूर्वी २०१८ (गोल्ड कोस्ट) आणि २०२२ (बर्मिंगहॅम) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. आता ग्लासगोमध्येही तिने सलग तिसरे सुवर्ण जिंकत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक, तर पहिले सुवर्णपदक ठरले. अपेक्षेप्रमाणे मीराबाईने भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले.
स्रॅच प्रकारात मीराबाईने ८२ किलो वजनाने सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. मात्र, दुस-या प्रयत्नात तिने यशस्वीरीत्या ८२ किलो वजन उचलले. त्यानंतर तिस-या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलत स्रॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला आणि अव्वल स्थान मजबूत केले. क्लीन अँण्ड जर्कमध्ये १०५ किलो वजनासह सुरुवात करताना ती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरली. पण दुस-या प्रयत्नात तिने हा निर्णयही सार्थ ठरवत सलग तिस-या सुवर्ण पदकावर नाव कोरले. एकूण १९० किलो वजन उचलत मीराबाई चानूने विक्रमी कामगिरीसह सुवर्ण हॅट्ट्रिकची किमया साधली आहे.
पॉवर लिफ्टिंगमध्ये २८ वर्षीय झंडू कुमारने कांस्य पदकासह भारताचे पदकाचे खाते उघडले. चौथ्या दिवशी पुरुष वेटलिफ्टिंगमधील ६० किलो वजनी गटात रिषिकांता सिंह याने रौप्य पदकाला गवसणी घालत भारताला दुसरे पदक मिळवून दिले. त्यानंतर गोल्डन क्वीन मीराबाई चानूनं सुपर्ण पदकाचा रकाना भरत भारताच्या खात्यात पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
















