मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरुवातीला मौन बाळगून असलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी आता व्यक्त होण्यास प्रारंभ केला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या मारलेल्या आंदोलकांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपला राजीनामा देण्याचीही तयारी असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, सरकारने शब्द दिला असल्यास तो पाळावा, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
आमदार सुभाष देशमुख व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. रविवारी रात्री व सोमवारी दुपारी आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या दिला. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. एकदिवसीय अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा अशी विनंती मराठा समाजाचा एक घटक म्हणून करत आहे, असे आमदार देशमुख यांनी या पत्रात नमूद केले आहे.