नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान मोदींचे गुलाम बनले आहेत. भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे केवळ आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही.
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकरांनी थेट संघावर प्रहार केला. इथले राजकीय पक्ष गुलाम होतायत का? अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. अगदी आरएसएसचे मोहन भागवत हेदेखील पंतप्रधान मोदींचे गुलाम झालेले दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींची छी थू होत असून देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची परिस्थिती आता सुरू झाली आहे.
जनतेनेच ठरवावा खरा विरोधी पक्ष
राजकीय व्यवस्थेला जर लकवा लागला असेल, तर सामान्य लोकांनी त्याविरोधात आवाज उचलला पाहिजे. जनतेला विरोधी पक्ष पाहिजे की नको? हे आता ठरवण्याची वेळ आली आहे. जो पक्ष भाजपासोबत जाणार नाहीत, तेच खरे विरोधी पक्ष आहेत, हा निकष आता जनतेनेच लावला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
















