मुंबई : तीव्र उष्णतेपासून दिलासा देणारा मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे.
तीव्र उष्णतेपासून दिलासा देणारा मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, सॅटेलाईट प्रतिमांमध्ये केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर शुक्रवारी दाट ढगांची दाटी दिसून येत असून ढगांचा हा पट्टा तळकोकणाच्या जवळपास पोहोचल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच राज्यात मोसमी वा-यांचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
अंदमान येथे १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू होती. त्यामुळे मान्सून केरळ किनारपट्टीवर कधी दाखल होतो, याकडे देशासह महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी केरळच्या किनापट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. मोसमी वा-यांनी आग्नेय बंगालचा उपसागर, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, कोमोरिन परिसराचा उर्वरित भाग, केरळ, नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने शुक्रवारी दिली.
दाट ढगांची दाटी
सॅटेलाईट प्रतिमांमध्ये केरळ किनारपट्टी, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनापट्टीवर शुक्रवारी दाट ढगांची दाटी दिसून येत आहे. त्यामुळे या प्रदेशात मान्सूनचे आगमन केव्हा होते यावर आता हवामान अभ्यासकांसह हवामान विभागाचेही लक्ष आहे. ढगांचा हा पट्टा हळूहळू तळकोकणाच्या दिशेने सरकत आहे. पुढील ४८ तासांत हीच स्थिती कायम राहिली, तर तळकोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी हवामानाची ही स्थिती अनुकूल मानली जाते.
राज्यात मान्सूनचे आगमन कधी?
पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून राज्यातील दक्षिण किनारपट्टीवर पुढील काही दिवसांत मोसमी वारे दाखल होतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार, रविवार, ७ जून किंवा सोमवार, ८ जून रोजी राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, स्थिती अनुकूल राहिल्यास या अंदाजाच्या आधीही मान्सून गोव्यासह तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज राज्यातील अनेक भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ तर काही भागात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
















