नाशिक : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. मात्र कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी राजीनाम्याद्वारे करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.