30.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडनांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राहील : आ. धिरज देशमुख

नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राहील : आ. धिरज देशमुख

दोन लाखांच्या मताधिक्याने वसंतराव विजयी होतील

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड हा काँगे्रसचा बालेकिल्ला होता, तो आहे आणि कायम राहील. केवळ आश्वासने देऊन दिशाभूल करणा-या भाजपला मतदारांनी यावेळी जागा दाखवावी, असे आवाहन करीत नांदेड लोकसभेचे काँगे्रस आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे दोन लाखांची मताधिक्याने घेऊन विजयी होतील आणि २६ तारखेला वसंत ऋतू फुलेल असा विश्वास युवा नेते तथा लातूर ग्रामीणचे आ. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.

काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ सोमवारी शहरातील सिद्दी मंगल कार्यालय येथे आ. धिरज देशमुख यांची सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. धिरज देशमुख यांनी मोदी सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था जगाच्या दहाव्या क्रमांकावर होती तेव्हा देशात पेट्रोल, सिलिंडर स्वस्त होते, सुशिक्षित बेरोजगारीचा दर विस टक्के होता आता भाजप दावा करते की देशाची अर्थव्यवस्था जगाच्या पाचव्या क्रमांकावर आहे मग महागाई वाढली, सुशिक्षित बेरोजगारीचा दर ७५ टक्के कसा काय झाला, असा प्रश्न उपस्थित केला. तर भाजपाला जाब विचारण्याची वेळ आली असून तो विचारलाच पाहिजे.

ज्या महाराष्ट्रातून ४८ खासदार दिल्लीत जातात त्या महाराष्ट्राचे उद्योग येथीलच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २५ खासदार असलेल्या गुजरातमध्ये पाठवतात हा ख-या अर्थाने महाराष्ट्र द्रोह आहे. याला उत्तर येथील जनता नक्कीच देणार आहे. नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार आहे. स्व. विलासराव देशमुख म्हणायचे काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ पण आजच्या घडीला आम आदमी का हात काँग्रेस के साथ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मावळ्यांनी मशाली घेऊन विजयाची तुतारी फुंकली आहे, तेव्हा वसंत फुलणारच असा विश्वास आ. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.

प्रा. रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले की, एक चव्हाण काँग्रेस सोडून गेले पण दुसरे चव्हाण काँग्रेसचा झेंडा घेऊन ताटपणे मैदानात उभे आहेत. जनता काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे विजय नक्कीच होणार. यावेळी माजी खा. सुभाष वानखेडे, डॉ. श्रावण रेपनवाड, सुरेंद्र घोडसजकर, प्रा. रवींद्र चव्हाण, राजेश पावडे, दत्ता कोकाटे, रेखाताई चव्हाण, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, बालाजी पांडागळे, भुजंग पाटील, निरंजन पावडे, शंकर शिंदे, सुनील कदम, सत्यपाल सावंत, शिवाजी पावडे, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR