नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची जोरदार चर्चा आहे. त्यातच संभाव्य बदलांबाबत एक यादी समोर आली आहे. मंत्रिमंडळातील फेरबदल पुढील काही दिवसांत म्हणजे रविवारी किंवा सोमवारी होऊ शकतात असेही बोलले जात आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती भवनात जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर संभाव्य कॅबिनेटमधील फेरबदलाला वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची जी यादी समोर आली आहे त्यात काही आश्चर्यकारक नावे आहेत. ज्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर शक्तिकांता दास यांचेही नाव समाविष्ट आहे. त्याशिवाय आणखी काही मोठी नावे आहेत. जी सध्याच्या कॅबिनेटमध्ये आहेत परंतु पुढील २-३ दिवसांत होणा-या कॅबिनेट बदलात त्यांचा डच्चू दिल्याचं पाहायला मिळू शकते. शक्तिकांता दास पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि माजी आरबीआय गर्व्हनर, यांचा संभाव्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. ज्यांच्याकडे अर्थ खाते देण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेसेनेत घेऊन एनडीएची ताकद वाढवण्यात श्रीकांत शिंदे यांचे मोठे योगदान आहे.
अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथील भाजपा खासदार पुन्हा एकदा केंद्रीय कॅबिनेटमध्ये समाविष्ट होऊ शकतात. अरूण गोविल मेरठचे भाजपा खासदार यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते. प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. राघव चड्डा अथवा अशोक मित्तल आम आदमी पक्षातून नुकतेच भाजपात सहभागी झालेले राघव चड्डा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. नितीश कुमार जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेत. त्यांचीही कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते. विष्णुदत्त शर्मा मध्य प्रदेशातील भाजपा खासदार विष्णुदत्त यांनाही कॅबिनेट मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. तरूण चुग भाजपाचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे प्रचारक हेदेखील कॅबिनेट मंत्रिमंडळात दिसू शकतात. आतापर्यंत त्यांनी संघटनेची जबाबदारी खूप चांगल्यारितीने सांभाळली आहे. जर्नादन सिंह सिग्रीवाल बिहारच्या महाराजगंज येथील भाजपा खासदार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
खात्यांची अदलाबदल
निर्मला सीतारामन यांच्याकडील सध्याचे अर्थ मंत्रालय खाते काढून त्यांना शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. मनोहर लाल खट्टर यांच्याकडून ऊर्जा मंत्रालयाचा कारभार काढला जाऊ शकतो. एखाद्या नव्या मंत्र्याला ही जबाबदारी मिळेल. शहरी विकास मंत्रालय त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.
















