35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेसाठी भाजपची नवी यादी जाहीर

लोकसभेसाठी भाजपची नवी यादी जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची १४ वी लिस्ट जारी केली आहे. या नवीन यादीत लडाखच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपने विद्यमान खासदार जाम्यांग त्सेंिरग नामग्याल यांचे तिकीट कापून ताशी ग्याल्सन यांना उमेदवारी दिली आहे. नामग्याल भाजपच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. दरम्यान, लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

लडाखचे विद्यमान भाजप खासदार जाम्यांग त्सेंिरग नामग्याल यांनी ६ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसभेत कलम ३७० वरील चर्चेदरम्यान जोरदार भाषण केले होते. त्यांचे भाषण इतके व्हायरल झाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या भाषणाचा व्हीडीओ शेअर करुन त्यांचे कौतुक केले होते.

कोण आहेत ताशी ग्याल्सन ?
ताशी ग्याल्सन हे प्रदीर्घ काळापासून भाजपशी संबंधित आहेत. आता ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असून, ते हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर आहेत. याशिवाय ताशी व्यवसायाने वकील आहेत. येथे त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवांग रिग्जिन जोरा यांच्याशी स्पर्धा आहे.

लडाखमध्ये २० मे रोजी मतदान
लडाखमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे ठेवण्यात आली असून, उमेदवारांना ६ मेपर्यंत नावे मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

मतदान आणि निकाल कधी?
लोकसभेच्या निवडणुका यावेळी सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत १९ एप्रिल २०२४ रोजी (१०२ जागांवर) मतदान झाले, तर दुस-या टप्प्यांत २६ एप्रिल रोजी ८९, तिस-या टप्प्यांतर्गत ७ मे रोजी ९४, चौथ्या टप्प्यांतर्गत १३ मे रोजी ९६, पाचव्या टप्प्यांतर्गत २० मे रोजी ४९, सहाव्या टप्प्यांतर्गत २५ मे रोजी ५७ आणि सातव्या टप्प्यांतर्गत १ जून रोजी लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होणार आहे. तर, ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर केले जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR