28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडा‘चोकर्स’ नव्हे ‘ब्रोकर्स’

‘चोकर्स’ नव्हे ‘ब्रोकर्स’

अनेक वर्षांपासून द. आफ्रिकेच्या नावामागे ‘चोकर्स’चा धब्बा लागला आहे. तो यंदाच्या विश्वकप स्पर्धेत धुऊन टाकण्याचा द. आफ्रिकेचा चंग दिसतो. ऐन मोक्याच्या क्षणी हात-पाय गाळायची वाईट खोड आता त्यांना गाडायची आहे. आतापर्यंतचा त्यांचा खेळ पाहता हा संघ अत्यंत बलाढ्य बनल्याचे जाणवते. त्यांचे फलंदाज तुफान फॉर्मात आहेत. गोलंदाजी भेदक बनली आहे शिवाय क्षेत्ररक्षणही अफलातून होत आहे. क्विंटन डी कॉक धावांचा नव्हे शतकांचा रतीब घालतोय, त्याला मार्करम, क्लॅसेन सुरेख साथ देत आहेत. यानसेनची खतरनाक अष्टपैलू म्हणून जडणघडण होत आहे. बांगला देशविरुद्धच्या सामन्यात डी कॉक-क्लॅसेन जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. दोघांनीही अनेकवेळा चेंडू आकाशभरारीसाठीच पाठवले.

वानखेडेची खेळपट्टी द. आफ्रिकेला चांगलीच भावली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी चारशे धावांपर्यंत मजल मारली होती. बांगला देशविरुद्ध डी कॉक द्विशतकाकडे निघाला होता परंतु १७४ वर तो बाद झाला. या खेळीत त्याने १५ चौकार आणि ७ षटकार उडवले. स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक. क्लॅसेन तर तुफान खेळला. त्याने ४९ चेंडूत ९० धावा काढताना २ चौकार आणि ८ षटकार ठोकले. द. आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३८२ अशी मजल मारली. मुस्तफिझूर, शोरफुल इस्लाम, शाकीब आणि हसन महमूदने प्रत्येकी ६० पेक्षा अधिक धावांची खैरात केली.

गोलंदाजीत बांगला टायगर शेळी बनला. लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीतही त्यांची ससेहोलपट झाली. लिटन आणि तंझीदला चांगली सलामी देता आली नाही आणि बघता बघता त्यांची १२ षटकांत ४ बाद ४२ अशी दारुण स्थिती झाली. शांतो (०), शाकीब (१) आणि मुशफिकर (८) या भरवशाच्या फलंदाजांनी टोणगे दिल्याने बांगलाचा नामुष्कीकारक पराभव होणार हे ठळकपणे दिसू लागले. परंतु ‘ओल्ड इज गोल्ड’ महमदुल्लाच्या मनात वेगळेच होते.

तो जिद्दीने लढत राहिला. तळाच्या फलंदाजांची साथ घेत त्याने १११ चेंडूत १११ धावा काढताना ११ चौकार आणि ४ षटकार लगावले. विश्वकप स्पर्धेसाठी महमदुल्लाची निवड करण्यात आली नव्हती. परंतु न्यूझिलंडविरुद्धच्या घरगुती मालिकेत तरुणाईने निराशा केल्याने ऐनवेळी महमदुल्लाला संधी देण्यात आली आणि त्यानेच थोडीफार लाज राखली. चोकर्सनी १४९ धावांनी विजय मिळवला. यंदा चोकर्स ‘ब्रोकर्स’ ठरणार असे दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR