मुंबई : प्रतिनिधी
पावसाअभावी राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असतानाच आता पाणीटंचाईने शेतक-यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण ४१८ गावे आणि १ हजार ५६८ वाड्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा केला जात आहे.
पाणीटंचाईची ही स्थिती प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, पावसाच्या खंडानंतर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आकडेवारीनुसार ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान राज्यातील ३६२ गावे आणि १ हजार ३५४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी ४११ टँकर कार्यरत होते. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच १४ ते २० सप्टेंबर या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या ३६२ वरून ४१८ वर पोहोचली, म्हणजेच ५६ गावांची वाढ झाली आहे. तसेच टँकरवर अवलंबून असलेल्या वाड्यांची संख्याही २१४ ने वाढून १ हजार ५६८ झाली आहे. मात्र, एकूण टँकरची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४११ वरून ४७९ वर आली आहे. यामध्ये शासकीय टँकरची संख्या १० इतकीच असून खासगी टँकरची संख्या वाढलेली आहे.
मराठवाड्यात टंचाईची झळ
– छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये टँकरची मागणी कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल तसेच अन्य स्थानिक जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
– पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील काही भागांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान असून पावसाचा खंड वाढल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन करण्यावर भर देणे आवश्यक झाले आहे.
















