मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावेत. पर्जन्यमान, भूजल पातळी, उपलब्ध पाणीसाठा, सुरू असलेले टँकर आणि जलस्रोतांची स्थिती लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांचे आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी येथे दिले. तसेच नाशिक विभागातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखावा अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेतला. बैठकीत संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करणे, ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे तसेच टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. तलाव, धरणे, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून त्याचा काटकसरीने वापर करावा. टंचाईची तीव्रता वाढण्यापूर्वीच आवश्यक पर्यायी स्रोत, टँकर आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना पाटील यांनी विभागाच्या अधिका-यांना केल्या.
टंचाईग्रस्त भागात नाला खोलीकरण, गाळ काढणे, बंधारे, शोषखड्डे, रिचार्ज शाफ्ट, विहिरींची दुरुस्ती आणि खोलीकरण, विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी तसेच जलसाठवण क्षमता वाढविण्याची कामे प्राधान्याने करावीत. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देणे हे सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे.त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचे काम युद्धपातळीवर करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश पाटील यांनी दिले. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तलाव, धरणे आणि अन्य जलस्रोतांमधील पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्याचा काटकसरीने वापर करावा. आवश्यक ठिकाणी पॉण्ड तयार करून साठवण क्षमता वाढवावी तसेच विद्यमान स्रोतांचे बळकटीकरण करावे. अनधिकृत जोडण्या अथवा पाणी उपसा आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी.
















