30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रहेमंत गोडसेंना तिकिट दिल्याने ओबीसी समाज आक्रमक

हेमंत गोडसेंना तिकिट दिल्याने ओबीसी समाज आक्रमक

नाशिक : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. तर दुसरीकडे महायुतीत नाशिक लोकसभेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत रखडला होता. एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकच्या जागेसाठी कमालीचे आग्रही होते. तर भाजपनेदेखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकल्याने तिढा वाढतच चालला होता. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतरही नाशिकचा तिढा सुटत नव्हता. मात्र अखेर हेमंत गोडसेंना नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेमंत गोडसेंना तिकिट दिल्यामुळे ओबीसी समाज नाराज
आता छगन भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकिट दिल्यामुळे ओबीसी समाज नाराज असल्याचे समोर येत आहे. ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. आम्ही ७० टक्के ओबीसी आहोत तरीही तिकिट मिळाले नाही. ‘आता तरी ऊठ ओबीसी जागा हो!! असा मजकूर होर्डिंगवर लावण्यात आला आहे. मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR