27.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईचा समुद्र खवळणार, मोठ्या लाटा उसळणार

मुंबईचा समुद्र खवळणार, मोठ्या लाटा उसळणार

हवामान विभागाकडून ३६ तासांसाठी रेड अलर्ट

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, आज शनिवार, दिनांक ४ मे २०२४ रोजी सकाळी १२ वाजल्यापासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणा-या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या ३६ तासांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेषत: उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किना-यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे देखील आवाहन करण्यात येत आहे.
किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना या कालावधीत किना-यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून उसळणा-या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR