रायगड : जिल्ह्यातील रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणा-या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मंचावर उभे राहून आमदार दळवी यांनी तटकरे यांच्यावर जुने हिशोब चुकते करण्याची वेळ आल्याचे जाहीरपणे सांगितले.
तटकरे यांचा हा फसवणुकीचा धंदा आहे. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत गियर बदलला आणि आम्हाला पाठीमागून वार केला. नगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड, निधीचा प्रवाह, खर्चाचा हिशोब, हे सगळं आमच्याकडे आहे. येणा-या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही प्रत्येक आकड्याचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत, असा इशारा देत त्यांनी रोह्यातील आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात करून दिली.
महेंद्र दळवी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. या वेळी आम्ही सुनील तटकरे यांचे काम कदापि करणार नाही, असे सांगत त्यांनी तटकरे यांच्यासोबतच्या राजकीय नात्याला पूर्णविराम दिला. त्यांनी रोह्याच्या मतदारांना आवाहन करत म्हटले की, मला एक संधी द्या, मी तुमच्यासाठी काम करीन. गेल्या अनेक वर्षांत तटकरे यांनी फक्त स्वत:च्या फायद्याचाच विचार केला, पण रोहा शहर आणि जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या वक्तव्याने तटकरे विरोधी मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून रोह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.
आरेला कारे उत्तर देण्याची तयारी : तटकरे
मात्र, दळवींच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी नाव न घेता महेंद्र दळवींवर निशाणा साधत म्हटले की, रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे यांना आव्हान देण्याचं धाडस काही जण करत आहेत. पण अशी आव्हाने परतवून लावण्याची ताकद आमच्यात आहे. आरेला कारे उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर रोह्याच्या राजकीय वातावरणात तणाव अधिक वाढला असून, दोन्ही गटांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.
शिंदे गटाशी वाद आणखी पेटण्याची शक्यता
अनिकेत तटकरे यांनी पुढे बोलताना युवा नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले की, कालची पोरं आज येऊन बोलतायत. ज्यांना ना वयाचा इतिहास माहित, ना राजकारणाचा भूगोल, तेही आमच्यावर बोटं ठेवत आहेत. सुनील तटकरे यांना कोणीही येऊन टपली मारून जाईल आणि आम्ही शांत बसू असे होणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यांच्या या तीक्ष्ण शब्दांमुळे तटकरे समर्थकांमध्ये उत्साह तर निर्माण झाला, पण शिंदे गटाशी वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

