ठाणे : सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच यंदा दिवाळीत कांद्याचे भावही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
मात्र आता कांद्याचा भाव स्थिर ठेवण्यासाठी आणि जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाईल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीसह इतर
शहरांमध्ये सवलतीच्या दरातील १०० ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेला थोडा तरी दिलासा मिळेल. मात्र सरकारच्या या योजनेमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
ऐन दिवाळीत कांद्याचे भाव कडाडले. कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आता जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाईल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. त्याअंतर्गत आता नागरिकांना एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये २५ रुपये किलो दराने कांदा विकला जाणार आहे. त्यासाठी येत्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या ठिकाणी सवलतीच्या दरातील १०० ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.