33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूर‘आपला माणूस’ हीच माझी जमेची बाजू !

‘आपला माणूस’ हीच माझी जमेची बाजू !

वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गेल्या २६ वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आलो आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागाशी माझी पक्की नाळ जोडली गेली आहे. जन्म ग्रामीण भागातला आणि वैद्यकीय शिक्षणानंतर जिल्ह्यातच वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्यातून सतत सक्रीय राहिलो. यातून लातूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांमध्ये मी माझी ओळख निर्माण करू शकलो. माझ्यासारख्या माणसाला कसलाही राजकीय वारसा नसताना सामान्य माणसांनी राजकारणात येण्याची गळ घालून तशी मागणी वरिष्ठ पातळीपर्यंत लावून धरणे हीच माझी खरी ‘स्ट्रेन्थ’आहे आणि सर्वांना वाटणारा ‘आपला माणूस’हीच माझी सर्वांत मोठी जमेची बाजू आहे, असे लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी मनमोकळेपणे सांगितले. लोकसभा २०२४ ची रणधुमाळी सुरू झाली असून, लातूर लोकसभा मतदारसंघात माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराची भूमिका, मतदारसंघातील प्रश्न आणि विकासाचे व्हिजन या मुद्यावरून एकमतच्या चमूने त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

  • भाजपासारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असताना आणि निवडणुकीचे गणित पाहता ही निवडणूक तुम्हाला आव्हानात्मक वाटत नाही काय?
    खरे तर निवडणूक ही कोणतीही असो ती आव्हानात्मक असतेच. गेली २६ वर्षे मी वैद्यकीय सेवेत आहे. या सेवेतून सर्वसामान्य नागरिकांशी दररोजचा माझा स्नेह आहे. यातूनच जनसामान्याचे प्रश्न समोर आले. या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रयत्न मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून झाले नाहीत, अशी खंत नेहमी सामान्यांकडून ऐकायला मिळाली. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना या प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रभावी माध्यम हे राजकीय व्यासपीठच असल्याचे लक्षात आले आणि त्या दृष्टीने विचार झाला. सामान्यांनीही या विचाराला बळ दिले. त्यामुळे भाजपाचे आव्हान आता माझ्या टप्प्यात असल्याची जाणिव मला झाली आहे. त्यामुळे सत्ताधा-यांचे निवडणुकीचे गणित काहींही असले तरी सामान्यांनी मला दिलेल्या पाठबळातून हे राजकीय गणित सोडविण्याचे स्कील सापडले आहे.
  • भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मात देण्यासाठी तुमचे मुद्दे आणि वेगळेपण काय असणार आहे?
    भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी गेल्या पाच वर्षांत सांगण्यासारखे एकही काम मतदारसंघात केलेले नाही. उलट विकासरत्न विलासराव देशमुख यांनी केलेल्या विकासकामांची सर्वात मोठी शिदोरी आमच्या जवळ आहे. आमच्या जवळ सर्वात वेगळा मुद्दा हा आहे की, काँग्रेस पक्षाने कधीही धु्रवीकरणाचे राजकारण केले नाही. राजकारणासाठी जाती, धर्माचा वापर केला नाही. सर्वधर्मसमभाव माणून आम्ही पुढे जात आहोत. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेली विकास कामे, सहकार क्षेत्रात निर्माण केलेला सहकार पॅटर्न, साखर उद्योगाचे जाळे, काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी फळी व सामान्य नागरिकांचे आशिर्वाद घेवून आम्ही पुढे जात आहोत. लोकांसमोर जाताना एक विशेष धोरण आम्ही ठरवलेले आहे. ग्रामीण माणसांशी आमची नाळ जुडलेली आहे. दररोज जनसामान्यांशी आमचा संपर्क होतो आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी ८० टक्के पूर्ण झाली आहे. सर्वांनाच मी ‘आपला माणूस’ वाटतो हे माझे बलस्थान आहे.
  • आपली उमेदवारी ही मूळ अनुसूचित जाती प्रवर्गावर अन्याय करणारी आहे, असे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे काय?
  • खरे तर असा विचार करणारेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रतारणा करीत आहेत की काय, असे वाटते. असे नसेल तर मग ते केवळ राजकीय हेतूने असे बोलत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असंख्य जातींचा समावेश आहे. त्यापैकीच मी एक आहे. अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा अधिकार मलाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाला हे त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरुनच काँग्रेस पक्षाने मला लातूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझी उमेदवारी ही कोणावरही अन्याय करणारी नसून ती डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारानुसारच आहे.
  • निवडणुकीच्या प्रचारात समोरील उमेदवाराकडून विखारी प्रचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कसे प्रत्युत्तर देणार?
    स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा आतापर्यंतचा काळ पाहिला तर काही अपवाद वगळता सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाने देशाचे नेतृत्व केलेले आहे. हे नेतृत्व करीत असताना काँग्रेस पक्षाने कधीही टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारुन देशाला महासत्तेच्या दारात नेवून सोडले. परंतु, दुर्दैवाने गेल्या १०-१२ वर्षांत देशात धुु्रवीकरणाचे राजकारण सुरु झाले. जाती, धर्माच्या नावाचा वापर करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाला आहे. संविधान सर्वोच्च मानणा-या भारतीयांना मात्र धार्मिक ध्रूवीकरणाचे राजकारण नको आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपाकडून होणारा विखारी प्र्रचार सामान्य नागरिकांच्या पचणी पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाजपा विखारी प्रचार करणारच आ.हे. त्याला काँग्रेसचा सर्वधर्मसमभावाचा विचार हेच प्रत्युत्तर असेल.
  • लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने लातूरमधील काहींना भाजपात प्रवेश दिला. भाजपाचा हा काँग्रेस महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल?

भाजपाने लातूरच नव्हे तर संपूर्ण देशभरात फोडाफोडीचे राजकारण केले हे सर्वश्रूत आहे. लातूरमध्ये काँगे्र्रेसच्या मोठ्या नेत्याच्या स्नुषा यांना भाजपात प्रवेश दिला. राजकीय आखाडा म्हणून भाजपाने हे केले खरे मात्र याचा महाविकास आघाडीवर काहींही परिणाम होणार नाही. कारण नागरिक जात, धर्म नव्हे तर उमेदवार पाहून मतदान करणार आहेत. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँगे्रस सोडलेली नाही. आज ते नव्वदीच्या घरात आहेत. त्यांची प्रकृती साथ देत नाही. असे असले तरी त्यांचा आशीर्वाद मात्र मलाच आहे. त्यांच्या घरातील एक माणूस इतर पक्षात गेला म्हणून सर्व संपले असे नव्हे तर त्यांनी योग्य ती भूमिका घेत मला आशीर्वाद दिला आहे.
(विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग उद्याच्या अंकात)

  • लातूर लोकसभा मतदारसंघ
    भाग – १

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR