27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील सात लाखांपैकी फक्त २८ हजार दुकानांना मराठी पाट्या

मुंबईतील सात लाखांपैकी फक्त २८ हजार दुकानांना मराठी पाट्या

  सोमवारपासून होणार कारवाई

मुंबई : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी (ता. २५) संपणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (ता. २७) दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

प्रतिकर्मचारी दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सुमारे सात लाख दुकाने-आस्थापनांपैकी फक्त २८ हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दुकानदारांना पालिकेने तीन वेळा मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतरही अवघ्या २८ हजार दुकानदारांनीच मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे समोर आले आहे.

व्यापा-यांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेऊन दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. ती २५ नोव्हेंबरला संपणार असल्याने सोमवारपासून दुकानांवर मराठी पाटी नसेल, तर नोटीस न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
२०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होत्या. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचा-यांची संख्या विचारात घेण्यात आलेली नाही. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम सहाअन्वये नोंदणी केलेले प्रत्येक दुकान आणि आस्थापनेस कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे.
मद्यविक्रीच्या दुकानांना महनीय व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले होते. पालिकेने गेल्या वर्षी ३१ मेपर्यंत पाट्या मराठी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याविरोधात व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या बाजूने निर्णय देत २५ नोव्हेंबरपर्यंत दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याचे आदेश दिले आहेत. तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिका पथकांनी मुंबईभर तपासणी केली. त्यासाठी ७५ अधिकारी-कर्मचा-यांची टीम नियुक्त करण्यात आली होती. सर्व २४ विभागांतील दुकानांवर मराठी पाटी नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर २८ हजार दुकानदारांनी मराठी पाट्यांचा नियम अंमलात आणला.

प्रतिकर्मचारी दोन हजार दंड
– दुकाने-आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची तपासणी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ पर्यवेक्षक तैनात आहेत. शिवाय त्यांच्यासोबत एक सहायकही राहील.
– मराठी पाटी लावण्यास एखाद्याने नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास एका कामगारामागे दोन हजार रुपये दंड भरावा लागेल.

मनसे आक्रमक
२५ नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची व्यापा-यांना देण्यात आलेली मुदत संपत आल्याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. ‘चार दिवसांत मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर मनसेचा खळखट्याक’ असा मजकूर असलेले बॅनर्स ठिकठिकाणी लागले आहेत. त्यामुळे मनसे मराठी पाट्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR