इस्लामाबाद : पाकिस्तानने दाऊदी बोहरा समुदायाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-पाक’ देण्याची घोषणा केली आहे. डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे पाकिस्तानकडून ‘निशान-ए-पाक’ने सन्मानित होणारे चौथे भारतीय असतील. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या योगदानामुळे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. दाऊदी बोहरा पंथाचे पालन करणारे बहुतेक लोक मुंबईत राहतात.
मात्र, हा सत्कार समारंभ कोणत्या दिवशी आयोजित केला जाईल याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानमध्ये ‘निशान-ए-पाक’ हा सन्मान देशाच्या सर्वोच्च लष्करी सन्मान ‘निशान-ए-हैदर’च्या बरोबरीचा मानला जातो. मोरारजी देसाई हे पहिले भारतीय होते ज्यांना १९९० साली ‘निशान-ए-पाकिस्तान’ सन्मान देण्यात आला होता. त्यांच्यानंतर १९९८ मध्ये दिलीप कुमार आणि २०२० मध्ये काश्मिरी फुटीरतावादी नेते अली गिलानी यांना हा सन्मान देण्यात आला होता.
डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे दाऊदी बोहरा समुदायाचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत. या समुदायाचा वारसा फातिमी इमामांशी जोडलेला आहे, ज्यांना प्रेषित हजरत मोहम्मद यांचे वंशज मानले जाते. हा समुदाय मुख्यत्वे इमामांवर श्रद्धा ठेवतो. दाऊदी बोहराचे २१वे आणि शेवटचे इमाम तय्यब अबुल कासिम होते. त्यांच्या नंतर, दाई-अल-मुतलक सय्यदना नावाच्या आध्यात्मिक गुरूंची परंपरा ११३२ मध्ये सुरू झाली. दाई-अल-मुतलक म्हणजे समाजाचा सर्वोच्च नेता.