21.4 C
Latur
Friday, February 6, 2026
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरबाबत पाकची चिथावणीखोर भाषा

जम्मू-काश्मीरबाबत पाकची चिथावणीखोर भाषा

भारतासाठी धोक्याची घंटा? पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय घडले?

श्रीनगर : दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकण्याची एकही संधी सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून त्यांनी भारताविरोधात अधिकच आक्रमक भाषा वापरली आहे. गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिगणी पडली होती. त्यावेळी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर असीम मुनीर व शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी) काश्मीर एकता दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेत भाषण केले. यावेळी काश्मिरी जनतेला पाकिस्तान सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. इतक्यावरच न थांबता भारताकडील काश्मीरचा प्रदेश हा पाकिस्तानचा भाग होणार असल्याचे चिथावणीखोर विधान त्यांनी केले. काश्मिरी जनतेच्या इच्छेचा सन्मान करून आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी करूनच जम्मू-काश्मीरच्या वादाचा तोडगा काढला जाऊ शकतो. पाकिस्तानी जनता आणि नेतृत्वाच्या वतीने आम्ही काश्मीरमधील आमच्या भावंडांशी एकजूट व्यक्त करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताबरोबरच्या संघर्षाचा केला उल्लेख
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताबरोबर झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना शरीफ यांनी दावा केला की- जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पूर्ण ताकदीने समोर आला आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांना हाताशी धरून पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. याबाबत पाकिस्तान सरकार सतर्क असून आम्हाला फक्त शांतता हवी आहे. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळेपर्यंत इस्लामाबाद त्यांना पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिन्ना यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या गळयाची नस असे विधान केले होते. या विधानाचा पुनरुच्चार करून शरीफ यांनी सांगितले की काश्मीर अजूनही पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR