बलिया : बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी दुस-या दिवशीही सुरू आहे. सोनभद्र, कौशांबी आणि बलिया येथे कारवाई सुरू आहे, तर लखनौ येथील निवासस्थानी छापेमारी संपली आहे. येथे पथकाला सुमारे साडे ११ कोटी रुपये रोख रक्कम मिळाली आहे. याशिवाय महागडी घड्याळे, सोने-चांदी आणि मौल्यवान दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
बुधवारी आयकर पथकाने एकाच वेळी १५ हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. सूत्रांनुसार, आयकर विभाग १००० कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात फाईल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर नोंदी तपासत आहे. मात्र, अधिकृतपणे जप्तीची पुष्टी करण्यात आलेली नाही. लखनऊमध्ये बुधवारी सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत चालली. सुमारे ५० अधिका-यांनी शोधमोहीम राबवली. यावेळी कोणालाही आत-बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. आमदार आणि त्यांचे कुटुंब घरातच उपस्थित होते.
सोनभद्रमध्ये, छात्रशक्ती कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात २४ अधिकारी उपस्थित आहेत. गेट आतून बंद आहे. कंपनीचे कर्मचारीही आत आहेत. रात्री बाहेरून जेवण मागवून अधिका-यांनी भोजन केले. बुधवारी अधिकारी व-हाडी बनून पोहोचले होते. त्यांच्या गाड्यांवर लग्नाचे पंपलेट लावलेले होते. उमाशंकर सिंह हे बलियाच्या रसडा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर आहे. ते गेल्या महिन्यातच अमेरिकेतून रक्त बदलून परतले आहेत. सध्या, लखनऊ येथील निवासस्थानी आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी या छापेमारीला मानवतेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. योगी सरकारमधील मंत्री दिनेश सिंह हे उमाशंकर सिंह यांचे व्याही आहेत. ते म्हणाले एका मुलीचा बाप असल्याने मी तिच्या सुख-दु:खात तिच्यासोबत उभा राहीन. मुलगी सोडता येत नाही, राजकारण सोडता येते.

