40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आष्टीमार्गे होणा-या आगमनाप्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचे पालकत्व यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी एक बैठक घेतली. महायुतीचा उमेदवार ठरून आणि प्रचाराची दिशा निश्चित झालेली असताना महाविकास आघाडीत मात्र, जागा कोणाला सोडायची, याविषयीचा तिढा सुटलेला नाही.

बीडमध्ये मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवलेले अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले गेलेले बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. सोनवणे यांनी अजित पवार यांच्या पक्षाची साथ सोडणे हा धनंजय मुंडे यांना धक्का मानला जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी मावळत्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात ५ लाख ९ हजार ८०७ मते घेतली होती आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही सिंहाचा वाटा होता. मुळात सोनवणे यांना उमेदवारी देण्यामागे धनंजय मुंडे यांचाच आग्रह अधिक मानला गेला होता. दोघांचीही लढत विरोधातील भाजप उमेदवाराशी होती. आता राज्य पातळीवरील राजकीय संदर्भ बदलले आहेत. धनंजय मुंडे ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तो पक्ष भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहे.

पालकमंत्रिपदाची जबाबदारीही धनंजय मुंडे यांच्यावर आहे. भाजपमधील नाराज नेत्या म्हणून कायम चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीचे मन तयार करण्यातही धनंजय मुंडे यांचे कसब पणाला लागल्याची चर्चा सुरू असते. त्यामागे पंकजा यांच्या विजयासाठी प्रचाराची जबाबदारी हा एक भाग असून महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिला तर गठ्ठा मतदान फोडण्याचा अनुभव धनंजय मुंडे यांना त्यांच्या परळीतील विजयातून गाठिशी आलेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR