32.1 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीय‘पतंजली’ ने मागितली बिनशर्त माफी

‘पतंजली’ ने मागितली बिनशर्त माफी

सर्वोच्च न्यायालयात २ एप्रिलला हजर होणार

नवी दिल्ली : दिशाभूल करणा-या जाहिराती प्रकरणी बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.

न्यायालयाला दिलेल्या हमीपत्रात कंपनी आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पुन्हा ही चूक करणार नसल्याचे नमूद केले आहे. न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना २ एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही अवमानाची नोटीस बजावली होती आणि दोन आठवड्यांनंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आयएमएच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांविरोधात मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला होता.

यापूर्वी मंगळवारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बाळकृष्ण यांना यापूर्वी जारी केलेल्या नोटिसांवर उत्तर न देण्यावरून न्यायालयाने आक्षेप घेतला होता. न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचे प्रथमदर्शनी उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. बाबा रामदेव यांच्यावर अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणाही खंडपीठाने नोटीसद्वारे केली आहे. पतंजली आयुर्वेद ही लिस्टेड कंपनी पतंजली फूड्सची पेरेंट कंपनी आहे.

न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
न्यायालयाने यापूर्वी बाबा रामदेव यांना नोटीस बजावून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून तीन आठवड्यांत उत्तर मागवण्यात आले आहे. याशिवाय कंपनीच्या जाहिराती छापण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने न्यायालयात हमीपत्रही दिले होते, मात्र असे असतानाही जाहिरात छापण्यात आली. त्यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली होती. जाहिरातींमध्ये बाबा रामदेव यांच्या चित्राचाही समावेश करण्यात आला होता, त्यामुळे त्यांनाही पक्षकार करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR