कोलकाता : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला पोलिस ठाण्यासमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक करण्यात आलेले पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी टीएमसीकडून निवेदन देण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला.
डोक्यावर ओला रुमाल ठेवून कल्याण बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आरोप केला आहे की, चंडीतला पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी जाणा-या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निवेदन सादर करण्यापूर्वीच टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वातावरण अधिकच तापले.
भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांविरोधात चोर-चोर अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आणि परिसरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच केंद्रीय सुरक्षा दलांनाही सज्ज ठेवण्यात आले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे.
अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करणारे टीएमसी नेत्याचे निकटवर्तीय
पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच जणांपैकी दोघेजण टीएमसीच्या माजी आमदार आणि यंदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या लवली मैत्रा यांचे निकवटर्तीय आहेत. लवली मैत्रा २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून जिंकून आल्या होत्या. यंदाही तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता, मात्र भाजपच्या रूपा गांगुली यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, अभिषेक यांच्यावर हल्ला करण्यामागचे मुख्य कारण काय होते, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
पाच जणांना अटक
बंगाल पोलिसांनी बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या व्हीडीओच्या आधारे पाच जणांना अटक केली आहे. तपन मैती, निर्मल्य सेनगुप्ता उर्फ जॉय, काजोल दास, देबासिस दत्ता आणि आकाश गायन अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
















