ढाका : भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात एका हिंदू पुजा-याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुभाष देऊरी असे २५ वर्षीय पुजा-याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २९ जून रोजी सुभाषचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याच्या कुटुंबियांकडे खंडणीही मागितली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्याचा शारीरिक आणि मानसिक छळही केला, असे स्थानिक माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची ढाका पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी व मंदिराचा पुजारी सुभाष देऊरी याचे सोमवारी (२९ जून) एका टोळक्याने अपहरण केले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन त्याला अमानुष मारहाण केली. त्यातील काही आरोपींनी सुभाषचा शारीरिक व मानसिक छळही केला. या घटनेवर बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे प्रवक्ते काजल देबनाथ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ढाका येथील एका हिंदू पुजा-याला मारहाण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हा प्रकार लुटमारीचा होता की त्यामागे अन्य काही कारण होते याची आम्ही माहिती घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
















