नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना हा आज बंगळुरूत होणार आहे. त्यापूर्वीच बंगळुरू पोलिसांनी चौथ्या टी-२० सामन्यावेळी प्रो पाकिस्तान घोषणाबाजी करणा-या दोन भारतीय व्यक्तींना अटक केली आहे.
नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपदरम्यान देखील पाकिस्तानी चाहत्यांना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखण्यात आले होते. बंगळुरूच्या न्यू गुराप्पना पालया भागात राहणा-या इनायत आणि सईद मुबारक यांना अटक झाली आहे. एका वृत्तानुसार त्यांनी बंगळुरूतील पबमध्ये प्रो पाकिस्तान अशी घोषणाबाजी केली. मोकाहॉलिक पबमध्ये हे दोन्ही आरोपी सामना पाहत होते.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहत असताना रात्री १०.३० च्या दरम्यान पब मॅनेजर सुधीर सिंह यांनी सामना सुरू असताना भारत माता की जय अशी घोषणा दिली. त्यानंतर सईद मुबारक आणि त्यांच्या मित्राने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली असा दावा केला जात आहे.
या घटनेनंतर सुधीर सिंह आणि या आरोपींमध्ये वाद झाला. पबने पाकिस्तान झिंदाबादचे स्लोगन चालणार नाहीत असं सांगितले. त्यानंतर मॅनेजरने पोलिसांना बोलावले. दरम्यान, पोलिसांनी इनायत आणि सईद यांना पकडले तर दोन मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना जेपी नगर पोलिस स्टेशनला नेण्यात आले.