मुंबई: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त वादळ आणले आहे. हा चित्रपट आता भारतात कमाईचे ‘शतक’ ठोकण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. अनेक नवीन हिंदी चित्रपट रिलीज होऊनही ‘राजा शिवाजी’चा थिएटरमधील दबदबा कायम आहे.
१७ व्या दिवशी (तिसऱ्या रविवारी) बंपर कमाई!
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच कोट्यवधींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडलाही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणले. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने आपल्या १७ व्या दिवशी (तिसऱ्या रविवारी) तब्बल ३.०५ कोटी रुपयांची धमाकेदार कमाई केली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषिकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत आहे. हिंदी पट्ट्यात ‘पती पत्नी और वो २’, ‘आखरी सवाल’ आणि ‘भूत बंगला’ यांसारख्या नवीन चित्रपटांचे तगडे आव्हान असतानाही ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर पाय रोवून उभा आहे.
चित्रपटाचा आतापर्यंतचा गल्ला:
पहिला आठवडा: ५२.६५ कोटी रुपये
दुसरा आठवडा: २४.३० कोटी रुपये
१५ वा दिवस: १.४५ कोटी रुपये
१६ वा दिवस: २.७० कोटी रुपये
१७ वा दिवस (तिसरा रविवार): ३.०५ कोटी रुपये
एकूण १७ दिवसांची कमाई: ८४.१५ कोटी रुपये (ग्रॉस आकडा जवळपास ८५ कोटी)
‘सैराट’चा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त ‘इतकी’च अंतर!
मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाचा ९० कोटींचा रेकॉर्ड सर्वोच्च स्थानी आहे. ‘राजा शिवाजी’ने १७ दिवसांत ८५ कोटींचा टप्पा गाठला असून, ‘सैराट’ला मागे टाकण्यासाठी या चित्रपटाला आता केवळ ६ कोटी रुपयांची गरज आहे. हा टप्पा पार करताच ‘राजा शिवाजी’ भारतातील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरेल आणि इतिहास रचेल. त्यानंतर या चित्रपटाचे पुढील लक्ष्य बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट बनणे हे असणार आहे.
| रँक | चित्रपटाचे नाव | एकूण कमाई (भारतात) |
| १ | सैराट | ९० कोटी रुपये |
| २ | राजा शिवाजी | ८५ कोटी रुपये (१७ दिवसांत) |
| ३ | बाईपण भारी देवा | ७६.२८ कोटी रुपये |
| ४ | वेड | ६१.२ कोटी रुपये |
| ५ | नटसम्राट | ४२ कोटी रुपये |
| ६ | पावनखिंड | ३७.७२ कोटी रुपये |
| ७ | लय भारी | ३७ कोटी रुपये |
| ८ | कट्यार काळजात घुसली | ३५ कोटी रुपये |
| ९ | ठाकरे | ३१.६ कोटी रुपये |
| १० | टाईमपास | ३० कोटी रुपये |
आता रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत १०० कोटींचा नवा इतिहास रचणार का, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
















