मुंबई : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर शेतकरी रविकांत तुपकर आज मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. सोमठाणा या गावात सध्या तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. रविकांत तुपकर आज बुलडाणा आणि नंतर शेकडो वाहनं आणि हजारो शेतक-यांसह मुंबईकडे निघणार आहेत.
शेतक-यांच्या प्रश्नावर मंत्रालय ताब्यात घेण्याच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही मोठा बंदोबस्त सोमठाणा गावापासून बुलडाण्यापर्यंत ठेवला आहे. दरम्यान, सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. तसेच काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस नाही तरी सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून कापसाला १२ हजार आणि सोयाबीनला १० हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच जंगली जनावरांपासून शेतक-यांना संरक्षण द्यावे असे ते म्हणाले. मुंबईला मुक्कामी जाणार आहे, रोक सको तो रोक लो असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
… तर रक्तपात होईल : तुपकर
तुपकर म्हणाले, आम्ही आज मुंबईकडे निघणार आहोत. सरकारने बळाचा वापर केला तर रक्तपात होईल. आम्हाला थांबविण्याचा प्रयत्न केल्यास शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमी कावा करत आमच्या चार टीम आधीच मुंबईत दाखल झाल्या आहेत. काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणारच. काही सत्ताधारी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी मागे हटणार नाही. शेतक-यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकरांनी मांडली.