लंडन : सलामीवीर बेन डकेटचे शतक आणि जो रुटसह जेकब बेथेलच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने टीम इंडियासमोर विक्रमी ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची दमदार भागीदारी रचली. जो रुट पुन्हा एकदा नाबाद राहिला अन् इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात ३ बाद ३८७ धावा केल्या. लॉर्ड्सच्या मैदानातील सर्वोच्च धावसंख्येसह इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाकडून बेन डकेट आणि जेकब बेथल या जोडीने पहिल्या विकेटसाठी विक्रमी १९२ धावांची भागीदारी रचली. पहिल्या विकेटसाठी लॉर्ड्सवर झालेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. एवढेच नाही तर टीम इंडियाविरुद्धचीही इंग्लंडकडून पहिल्या विकेटसाठी ही सर्वोच्च धावसंख्येची भागीदारी ठरली. प्रसिद्ध कृष्णानं ९१ धावांवर जेकबच्या खेळीला ब्रेक लावला. रोहित शर्माने त्याचा झेल टिपला. बेन डकेट याने १३५ चेंडूत १४१ धावांची खेळी केली. लॉर्ड्सच्या मैदानातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.
प्रसिद्ध कृष्णाने हॅरी ब्रूकच्या रुपात इंग्लंडच्या संघाला तिसरा धक्का दिला. त्याने १४ धावा केल्या. पण जो रुटनं पुन्हा एकदा फिफ्टी प्लसचा डाव साधला. विशेष म्हणजे त्याने ४८ चेंडूत ७४ धावांची नाबाद खेळी साकारली. सलग सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी साकरण्याचा डाव साधताना जो रुट टीम इंडियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला जोस बटलरने १३ चेंडूत ४१ धावा कुटल्या. या दोघांनी निर्धारित ५० षटकात इंग्लंडच्या धावफलकावर ३८७ धावा लावल्या. लॉर्ड्सच्या मैदानातील वनडेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
















