नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा कुणाचा? या मुद्यावरून सुरु असलेल्या संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात उद्यापासून (सोमवार) नियमित सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला असल्याने आयोग कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली होती. अजित पवार गटाने मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रे दाखल केली असून त्यात मृत लोक, अल्पवयीन मुले, डिलिव्हरी बॉय, इतर पक्षांतील लोक, गृहिणी, सेल्स मॅनेजर आदींच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश असल्याचा दावा सिंघवी यांनी आयोगासमोर केला होता. खोटी माहिती दिल्याबद्दल भारतीय दंड संहितेतील कलम संबंधितांविरोधात लावली जावीत, अशी मागणीही सिंघवी यांनी केली होती.
अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या ८,९०० शपथपत्रांत त्रुटी आहेत व यातील काही त्रुटी
आयोगाने मान्य केल्या आहेत, असे सिंघवी यांनी सांगितले होते. बनावट सदस्यांची २४ प्रकारची वर्गवारी करण्यात आली असून आयोगाची कशा प्रकारे दिशाभूल करण्यात आली, याचा घटनाक्रम मांडण्यात आला असल्याचे सिंघवी यांच्याकडून सांगण्यात आले होते. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोगासमोर किती दिवस नियमित सुनावणी चालणार आणि निकाल कधी येणार, यावर सर्वांची नजर असणार आहे.