33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्यावरून महायुतीत बेबनाव, भाजपा पदाधिका-यांचे राजीनामे

ठाण्यावरून महायुतीत बेबनाव, भाजपा पदाधिका-यांचे राजीनामे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाम भुमिकेपुढे भाजपाने नमते घेऊन ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याने भाजपा नेते गणेश नाईक नाराज झाले असून, भाजपाच्या नवी मुंबईतील पदाधिका-यांनी आज सामूहिक राजीनामे दिले. यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून नाराजांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.

ठाणे लोकसभेसाठी भाजपाने यावेळी आग्रही भूमिका घेतली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्ल्यातील मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला. शेवटपर्यंत प्रयत्न करून, दबाव आणूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दाद न दिल्याने अखेर भाजपाला ठाण्याचा आग्रह सोडावा लागला. शिंदेंनी तेथून आपले निकटवर्तीय व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजीव नाईक येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. भाजपाकडून विनय सहस्त्रबुद्धे यांचेही नाव चर्चेत होते. पण मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ सोडला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे निवडणूक प्रचाराची रणनीती निश्चित करण्यासाठी गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊस येथे भाजप पदाधिका-यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक उपस्थित होते. पण भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांना तेथून निघावे लागले. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या निषेध म्हणून गणेश नाईक समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. निवडणूक अठरा दिवसांवर आलेली असताना उमेदवारी जाहीर झाल्याने मतदारांपर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान नरेश म्हस्के यांच्यापुढे असताना, महायुतीतील या नाराजीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR