34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवारी अर्जासाठी शुक्रवार अखेरचा दिवस

उमेदवारी अर्जासाठी शुक्रवार अखेरचा दिवस

मुंबई : प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपत असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग वाढली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईतील उमेदवार अमोल कीर्तिकर, काँग्रेसचे उत्तर मुंबईतील उमेदवार भूषण पाटील, शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, शुक्रवारी पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे.

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपत आहे. शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार यामिनी जाधव, रवींद्र वायकर, ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के, भाजपचे उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम हे शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अठराव्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या १३ लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत आहे. या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांसह छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी आपले अर्ज दाखल केले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर कीर्तिकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार भूषण पाटील यांनीही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, भाई जगताप, चरणसिंह सप्रा आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भाजपचे गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे आदी उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन
कल्याणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. शिंदे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR