मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचा-यांचे निवृत्ती वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे होऊ शकते. तसा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सांगितले आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक पार पडली. या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचा-यांना दिलासा देऊ शकते, असे महासंघाने म्हटले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ डिसेंबर रोजी महासंघाने एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक गुरुवारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीत निर्णय होणार?
या बैठकीत जुनी पेन्शन योजना आणि कर्मचा-यांच्या निवृती वयासंदर्भात चर्चा होणार आहे. वयाची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे संघटनेने स्पष्ट केलं आहे. महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी याबाबत माहिती दिली.