31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात तापमानात वाढ

राज्यात तापमानात वाढ

मुंबईत पुढील ५ दिवस उकाड्याचा इशारा; अकोल्यात सर्वाधिक ३८.७ अंश से. तापमानाची नोंद

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र आता तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात उन्हाचे चटके तापदायक ठरत आहेत. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ आणि संध्याकाळनंतर गारठा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईतही पुढील ५ दिवस तापमानवाढीचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे नीचांकी १५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

तसेच सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी राजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तर दुसरीकडे मे महिना सुरू होण्यापूर्वीच वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या कडाक्याच्या उन्हातून बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

कोकणात यलो अलर्ट
दरम्यान हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये कमाल तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तापमानाचे आकडे जरी खूप जास्त वाटत नसले तरी, हवेतील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता खूप जास्त असेल, ज्यामुळे लोकांना अत्यंत दमट हवामानाचा सामना करावा लागू शकतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये, दमट उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR