नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा फॉर्मशी झुंजत आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. तसेच, लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी रोहित शर्माबाबत अतिशय महत्त्वाचे विधान केले आहे.
मला वाटत नाही की रोहितसारख्या महान खेळाडूवर कसलाही दबाव असेल. तो दडपण हाताळण्याबाबत अनुभवी खेळाडू आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत, पण त्याने काही फरक पडत नाही. आम्हाला वाटलं होतं की आज तो चांगला खेळेले, एक मोठी खेळी करेल, पण क्रिकेटमध्ये असे घडत असते. रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू कधीही दबावात येऊ शकत नाही, तो कोणत्याही प्रकारच्या दबावाच्या पलीकडे जाऊन खेळतो असे सितांशु कोटक म्हणाले. रोहित शर्मा मैदानावर संघर्ष करत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना कोटक म्हणाले, मी खूप क्रिकेट खेळलो आहे आणि क्रिकेट पाहिलेही आहे. कधीकधी फलंदाजांना हवी तशी लय मिळत नाही. पण याचा अर्थ तो संघर्ष करतोय असा होत नाही. कार्डिफच्या खेळपट्टीवर दुहेरी बाऊन्स होता, त्यामुळे रोहितला मनसोक्त फटकेबाजी करता आली नाही आणि तो त्याचे नेहमीचे शॉट्स खेळू शकला नाही.
लॉर्ड्सवर हिटमॅनचे पुनरागमन होणार?
दुस-या सामन्यात रोहितने ४७ चेंडूत २६ धावांची संथ खेळी केली. खेळताना तो काहीसा चाचपडताना दिसला आणि विल जॅक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या सामन्यातही तो केवळ ११ धावाच करू शकला होता. या कामगिरीनंतर आगामी २०२७च्या विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या संघातील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. लॉर्ड्सवर तुम्हाला एक पूर्णपणे वेगळा रोहित शर्मा पाहायला मिळू शकतो. त्याच्यासारखा खेळाडू कधीही फॉर्मात परतू शकतो, त्यामुळे त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याची गरज नाही असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला.
















