मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज गुरूवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार, हे स्पष्ट होईल. महापौर पदाच्या आरक्षणात स्पष्टता आल्यानंतर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग येणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मुंबई महापौरपदाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होऊन दुस-या दिवशी निकाल जाहीर झाले. १६ जानेवारीला निकाल घोषित झाल्यापासून मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. या शिवाय भिवंडी, चंद्रपूर येथेही महापौरपद पटकावण्यावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यात चढाओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकांच्या महापौर पदाची सोडत निघत आहे.
नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघेल. या सोडतीत कोणत्या महापालिकेतील महापौर पद आरक्षित झाले आणि कोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार हे स्पष्ट होईल. नगर विकास विभागात सध्या महापौर आरक्षण सोडतीची जोरात तयारी सुरू आहे. नव्याने गठीत करण्यात आलेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये कार्यकाळ संपण्याआधी शेवटचे महापौर पदाचे आरक्षण कधी लागू झाले आणि त्याची मुदत कधी संपली, याची माहिती गोळा करण्यात आली आहे.
महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाईल त्यामुळे या आधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे, अशी माहिती नगर विकास विभागाच्या अधिका-यांनी बुधवारी दिली.
प्रथम एससी, एसटीसाठी होणार आरक्षण सोडत
सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत निघेल. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाईल. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असणार आहे, असेही या अधिका-याने सांगितले.
या महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी -निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड.

